मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

परतीच्या वाटेवर ती अनपेक्षीतपणे भेटली,
ओळख ना पाळख माझ्या सोबत चल म्हंटली
मी निर्लज्ज झालो
तिच्या सोबत गेलो
दिशा तिच पण वाट नवी होती, धागा तोच पण गाठ नवी होती
सृष्टी तिच पण भास नवा होता, आयुष्य तेच पण श्वास नवा होता
सोबत तिच पण हात नवा होता, हृदय तेच पण उन्मात नवा होता
मी चालत होतो
मी बोलत होतो
तिच्यासोबत डोलत होतो
चालता चालता शेवटी आम्ही तिच दुनिया गाठली
पुन्हा तिथेच येण्याची माझी मलाच लाज वाटली
रागावलो तिच्यावर, रागातच विचारलं तिला
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवयं मला
ती गालातच हसली
जवळ येऊन बसली
“ज्या जगापासुन दुर जात होतो त्याच जगात मला का आणलस?
प्रेमात अडकलेल्या माझ्या मनाला परत प्रेमानेच का विणलस?”
“हेच तर तुझं जग आहे इथेच तर तुला यायचं होतं,
त्याच जगातली मी एक आठवण मला तिथेच तर तुला न्यायचं होतं.”